
- MyTri
- January 12, 2024
सहजप्रवृत्ती जिज्ञासा — शिकण्याचा मुलाधार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने सर्वप्रथम सहज प्रवृत्तींचा (Natural Instincts) अभ्यास करून प्रयोग केलेत त्यातून त्यांनी 18 सहज प्रवृत्ती सांगितल्या. या सहजप्रवृत्तीच्या माध्यमातून मानवाचे तसेच प्राण्यांचे वर्तन घडते त्या वर्तनातून तसे अनुभव येतात. या अनुभवातून ज्ञान मिळते म्हणजेच शिक्षण होते शिकणे होते. त्यामुळे या सहजप्रवृत्तींना शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष महत्त्व आहे. मॅकडुगल यांनी सांगितलेल्या सहज प्रवृत्तींपैकी क्षुधा, पलायन, काम, जिज्ञासा या काही सहज प्रवृत्ती आहेत. क्षुधा याचा अर्थ तहान ,भूक ( शारीरिक भूक, मानसिक भूक ). सहज प्रवृत्ती या शब्दाची व्याख्या बघितल्यास प्रवृत्ती म्हणजे करणे (वर्तन), प्रवृत्त होणे(करण्यास प्रेरित होणे) आणि सहज म्हणजे काहीही कष्ट , त्रास न घेता किंवा अतिशय अल्प कष्ट ,त्रास घेऊन. सहज प्रवृत्तींनशी निगडित वर्तन समजून घ्यायचे झाल्यास जसे “मानसिक भूक” या सहज प्रवृत्तितून हव्यास ही भावना निर्माण होते आणि हव्यासापोटी मनुष्य विविध भौतिक गोष्टी जमा (संग्रह) करून ठेवणे त्याची वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे, पैसै खाणे, पदासाठी भांडणे ,राजकारण करणे असे वर्तन घडते. सहज प्रवृत्ती या सर्व प्राणीमात्रांमध्ये कमीअधिक प्रमाणात स्थित असतात. म्हणजे असे म्हणायला हरकत नाही की त्या आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्या गरजा पूर्ण होतात व सोबत शिक्षण होते ज्ञान मिळते.
सर्वच सहज प्रवृत्ती मनुष्याचे शिक्षण घडवतात मात्र त्यापैकी जिज्ञासा ही सहज प्रवृत्ती शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त ठरत असल्यामुळे ती अधिक महत्त्वाची आहे. कारण जिज्ञासा ही काही प्रमाणात शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता येऊ शकते अर्थात ती जिज्ञासा नसून कुतुहल निर्माण करता येते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जिज्ञासा जागृत होते तर शिक्षकांच्या बाजुने तीच जिज्ञासा कुतूहल निर्माण करता येते. असे म्हणायला हरकत नाही की जिज्ञासा ही विद्यार्थ्याच्या बाजूने सॉफ्टवेअर आहे तर शिक्षकांच्या बाजूने ती कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. उदाहरणार्थ शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर प्रेरक मांडेल किंवा ठेवेल , प्रेरणा निर्माण करेल त्या पद्धतीने विद्यार्थी शिक्षकाच्या शिकविण्याकडे आकर्षित होतात एकाग्र होतात.
कोणत्याही व्यक्तीची जिज्ञासा केव्हा जागृत होते? याचा विचार केला तर असे लक्षात येते की एखादी अपरिचित घटना अनुभवणे, अपरिचित अनुभव घेणे, नवीन गोष्ट बघणे ऐकणे, गरजेतून तयार झालेली ओढ आवड, माहीत करुन घेण्याची इच्छा यांच्याशी सामना झाल्यावर जिज्ञासा जागृत होते. जिज्ञासाची तीव्रता ही कमी अधिक असू शकते व ती व्यक्तिपरत्वे पण बदलू शकते. परंतु वरील बाबी या व्यक्तींमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी प्रेरक म्हणूनच काम करतात. इथे शिक्षकाने या गोष्टीचा फायदा करून घ्यायला पाहिजे की विद्यार्थ्यांनी शिकण्यासाठी एकाग्र होण्यासाठी कोणते प्रेरक शिक्षकाने वापरायचे याचा विचार करून अध्यापनाचे नियोजन करावे.
हे समजून घेण्यासाठी एक वाक्य मदतगार ठरू शकते ते Great people do not do different things, they do the things differently . म्हणजेच शिक्षक जर एकच एक पद्धतीने विषय शिकवत असेल तर तो विद्यार्थ्यांना कंटाळवाणा वाटेल आणि यात विषय मांडण्याच्या पद्धतीत जर बदल केला तर विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत होण्यास मदत होऊन त्यांचे शिकणे सुलभ होईल. शिकविण्याच्या अध्यापनाच्या पद्धतीत बदल करण्याचे अनेक उपाय आहेत.जसे विद्यार्थ्यांना नुसती श्रवण भक्ती करणे आवडत नाही त्या ऐवजी त्यांना कृती करायला आवडते तर आपण पाठ्य वस्तू कृतींमध्ये रूपांतरीत करू शकतो, विद्यार्थ्यांना गटकार्य देऊन काम करायला देऊ शकतो, त्यांना विषयानुरूप माहितीचा शोध घ्यायला लाऊ शकतो , विद्यार्थ्यांनी मिळविलेली माहिती त्यांना सादर करायला लावू शकतो, अशयानुसार विद्यार्थ्यांचे गटा गटाने चर्चासत्र घेणे, निबंध लिहिणे कविता लिहिणे भाषण देणे, ई. ही सर्व उपाययोजना शिक्षकांनी विद्यार्थ्याची जिज्ञासा जागृत होण्यासाठी करणे म्हणजेच शिक्षकाने वापरलेली कृत्रिम बुद्धिमत्ता होय असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शिक्षकाने जिज्ञासा जागृतीसाठी तयार केलेले सॉफ्टवेअरच असेल ते.
जिज्ञासा जागृत झाल्यावरच मनुष्य प्रश्न विचारतो त्याला प्रश्न पडतात आणि जर शिक्षकांनी जिज्ञासा योग्य प्रकारे जागृत केली तर विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न तयार होतील ते ज्ञान मिळवीण्यास तयार होतील. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्याला मुक्तपणे शिक्षकांना प्रश्न विचारण्याची मुभा असणे गरजेचे आहे ते करायलाच हवे तरच विद्यार्थी स्वतः ज्ञान मिळवतील. असा प्रयोग करायला हरकत नाही की विद्यार्थ्यांनी पाठावर अध्यापनानंतर शिक्षकांना भरपूर प्रश्न विचारावेत व शिक्षकांनी सर्व प्रश्नांचे निराकरण करावे.
वर्गात शिक्षकांनी एखादे शैक्षणिक साहित्य शिकवायला नेले तर विद्यार्थी अतिशय कुतूहलाने ते साहित्य बघतात. यावरून शिक्षकांनी एक बोध घ्यायला हवा की साहित्य किंवा शैक्षणिक साहित्य ( दृक श्राव्य) हे विद्यार्थ्यांसाठी फार मोठे प्रेरक आहेत.
खरं तर शिक्षकाचे बोलणे, वागणे, हावभाव, कृती, हातवारे हे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरक म्हणून काम करतात तेव्हा शिक्षकांनी योग्य देहबोलीचा बॉडी लँग्वेज चा जाणीव पुर्वक वापर केल्यास विद्यार्थी प्रेरित होतील आणि प्रेरित व्यक्तीच हा शिकण्यास तयार असतो.
जिज्ञासा या सहज प्रवृत्तीचा विचार करून शिक्षकांनी जर अध्यापनाचे काम केले तर शिक्षकांचे अध्यापनाचे श्रम निश्चितच कमी होतील. परंतु त्यासाठी आवश्यकता आहे ती नियोजनाची. असे निदर्शनात येते की शिक्षक काय शिकवायचे याचे नियोजन करतात व ते नियोजन मुख्याध्यापकांना सादर करतात. आवश्यकता आहे ती कसे शिकवावे याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे ते केले तरच आपण जिज्ञासा हा शिकण्याचा मूलाधार पकडू शकतो.
प्रशांत डवरे,
ज्येष्ठ अधिव्याख्याता (सेवानिवृत्त),
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट),
अमरावती.
तथा
शैक्षणिक सल्लागार,
myelin, पुणे.